इंजिनिअरिंग, एमबीए महिलांचा अंगणवाडी सेविकेपदासाठी अर्ज
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदाच्या 108 जागांसाठी तब्बल 967 महिलांनी अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे या अर्जदारांमध्ये इंजिनिअरिंग, एमबीए, एमएस्सी, डीएड, बीएड यांसारख्या उच्चशिक्षित महिलांचा समावेश आहे.
राष्ट्रीय बालविकास सेवा योजनेच्या प्रकल्प १ आणि २ अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अंगणवाडी सेविकांच्या 22 जागांसाठी 206 अर्ज आले आहेत, तर मदतनीस पदाच्या 86 जागांसाठी 761 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. पात्रतेसाठी फक्त बारावी उत्तीर्ण असण्याची अट असतानाही उच्चशिक्षित महिलांनी या पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केल्याचे छाननीत आढळले आहे.
मानधन आणि समस्यांचा प्रश्न
अंगणवाडी सेविकांना दरमहा १०,००० रुपये तर मदतनीसांना ७,५०० रुपये मानधन दिले जाते.
याशिवाय त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळतो, मात्र तो वेळेवर न मिळाल्याने अनेकदा कर्मचाऱ्यांना आंदोलन करावे लागते.
या घटनेने बेरोजगारीची भीषणता समोर आली असून, उच्चशिक्षित महिलांनाही शासकीय मानधनाच्या नोकरीसाठी अर्ज करावा लागतो, हे वास्तव समोर आले आहे.